Wednesday, August 21, 2019

खवय्यांचे इंदोर


आत्तापर्यंत मी इंदोरला तीन वेळा गेलेय, वेगवेगळ्या कॉन्फरेन्स आणि वर्कशॉप साठी पण अजून पण इंदोर म्हटले कि डोळ्यासमोर  येते ते फक्त खाणे आणि खाणेच. इथले चाट चे प्रकार, भुट्टे का किस, फलाहारी मिसळ, पाणीपुरी, दहीपुरी, आलू टिक्की आणि काय काय. मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत पण ज्यांना आवडते त्यांनी इथल्या मिठाया गुलाबजाम बर्फी सहज फस्त कराव्यात अश्या आहेत.

पहिल्यांदा इंदोरला जाताना मी ट्रेन ने गेले होते माझ्या शेजारच्या सीट वर दोन इंदोर चे व्यापारी होते. माझी सीट खालची होती आणि त्यामधील एकाला वरची सीट मिळाली होती पण आपल्या प्रचंड देहयष्टीमुळे त्यांना वर जाणे शक्य नव्हते म्हणून मग त्यांनी मला तू वर जाशील का ? अशी विनंती केली अर्थात मी हो म्हणाले. काही वेळाने त्यांनी त्यांचे डबे उघडले आणि अर्थात मला खाण्यासाठी आग्रह केला माझे नुकतेच जेवण झाल्यामुळे मी त्यांना नाही म्हणाले पण मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन चे पुडे फोडले आणि  मग त्यावर ताव मारत, "आमचे इंदोर किती भारी आहे, तिथे कसले भारी नमकीन मिळतात आणि कसे मस्त मस्त चाट चे प्रकार आहेत" हे सांगू लागले. माझे जेवण झाले आहे आणि मी आता काही खाऊ शकत नाही हे त्यांना पटतच नव्हते, त्याच्या बोलण्याप्रमाणे नमकीन चाट गोड मिठाया या तर जेवणानंतर खायच्या असतात आणि त्या मी खायलाच हव्या होत्या :) पण त्यांनी जे मला इंदोर च्या सराफा बाजार चे वर्णन केले त्यावरून मला ती खाऊगल्ली पाहण्याची इच्छा झाली. मग ज्या ज्या वेळेस मी इंदोरला गेले तेव्हा सराफा बाजार ला गेले नाही असे कधी झालेच नाही. जेव्हा आमची आय आय एम इंदोर ला कॉन्फरेन्स होती तेव्हा आम्ही एवढ्या लांबून रोज सिटी मध्ये हे सगळे प्रकार खाण्यासाठी यायचो आणि परत जायचो.

इंदोर चा सराफा बाजार हा साधारण १००- १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. आपल्या सुवर्णव्ययसायाच्या सुरक्षिततेसाठी सराफांनी छोट्या खाद्य व्यावसायिकांना आपल्या दुकानासमोर ठेले मांडण्याची परवानगी दिली. तसेच या व्यवसायांमुळे लोकांची या  परिसरात गजबज राहील हा पण हेतू होताच. पण कालांतराने तिथे खाद्य व्यवसाय चांगलाच रुळला. लोक सोने खरेदी साठी नाही तर वेगवेगळे खमंग पदार्थ खाण्यासाठी इथे गर्दी करू लागले. साधारण रोज २००० ते २५०० लोक या परिसराला भेट देतात आणि हि खाऊ गल्ली रात्रभर चालूच असते.

इथे गेलात के काय खाल याची लिस्ट देत आहे. अर्थात हे सगळे पदार्थ खाण्यासाठी पोटात जास्तीची जागा ठेऊन जायला पाहिजे

छोले आलू टिक्की चाट-
 गरमागरम छोले आणि आलू टिक्की ज्याच्यावर इंदोरी शेव आणि तिखी मिठी चटणी दिली जाते. टिक्की अर्थातच जास्तीच्या बटर मध्ये तळलेली  असते. कॅलरीज चा अजिबात विचार करता हे टिक्की चाट खा. शर्माजी चाटवाले यांच्याकडे हे चाट खाण्यासाठी नेहमी गर्दी असते यात खरोखरच मस्त फ्लेवर आहेत थोडीशी तिखट गोड आंबट अशा चवीची टिक्की पोटात जाताच मन खुश होऊन जाते. पनीर छोले टिक्की साधी टिक्की मसाला टिक्की असे अनेक पर्याय आहेत.


भुट्टे का किस -
हा भुट्टे का किस एक इंदोरी पदार्थ आहे. भुट्टे म्हणजे मक्याची कणसे किसून शिजवून उपम्यासारखे बनवतात यात बनवताना  दूध टाकतात आणि मग ओल्या खोबऱ्याने सजवून हि डिश दिली जाते. हि पण मस्त डिश आहे जरूर ट्राय करा.

दही बडे
आपल्या कडच्या दहीवड्या सारखी हि डिश आहे पण अर्थातच सगळे इंदोरी मसाला फ्लेवर आहेत. जीरा पावडर चाटमसाला आणि गोड दही घालून हे दहिबडे दिले जातात. जोशी दहीबडा हाऊस यांचे  दहीबडे जास्त फेमस आहेत


गराडू चाट
थंडी च्या दिवसात इथले लोक गराडू चाट खातात, गराडू म्हणजे सुरण त्याचे छोटे छोटे काप करून त्यावर गराडू जरालू मसाला टाकतात या मसाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचे मिश्रण असते आणि मग या चाट वर लिंबू पिळून खायला देतात.


गोलगप्पे
गोलगप्पे अर्थातच पाणीपुरी जी वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर मध्ये मिळते. इंदोर मधील माणसे आरामात ३-४ प्लेट पाणीपुरी खातात यात पण दहीपुरी शेवपुरी मस्त आहेत.



मालपूवा गुलाबजाम -
सराफाच्या सुरुवातीलाच गुलाबजाम करणारे लोक आहेत पूर्ण कढई भरून गुलाबजाम पाकात मुरत घातलेले असतात यात कालाजामुन फेमस आहे ज्यांना गोड आवडते त्यांनी मालपुवा खावा.


मुंग कि भजिया
मूग कि भजिया म्हणजे मुगाची डाळ भिजवून बनवले भजे आणि त्यावर हिरवी चटणी गरमागरम भज्यांचा आस्वाद घेणयासाठी इथे खूप गर्दी असते.


शिकंजी
शिकंजी हे एक पेय आहे जे दुध दही केसर बदाम जायपत्री घालून बनवतात यात थोडेसे फ्रेश क्रीम पण घातलेले असते. हे  पण एक मस्ट ट्राय पेय आहे. ज्यांना कुल्फी आवडते त्यांच्या साठी शाही कुल्फी, फायर कुल्फी असे वेगवेगळे प्रकार आहेत जरूर खाऊन पहा.


अजून असे कितीतरी पदार्थ आहेत कि जे मला आता आठवत नाही अर्थात हे सगळे पदार्थ मी एकाच ट्रिप मध्ये खाल्लेत असे पण  नाही पण अजून इतक्या वर्षानंतर मला या सगळ्याबद्दल लिहावेसे वाटले म्हणजे ते किती टेस्टी असतील हे तुम्हीच ओळखा.

मग कधी निघताय इंदोर ला ??


या ब्लॉग मधील फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत आणि इंटरनेट वरून घेतले आहेत