Wednesday, August 21, 2019

खवय्यांचे इंदोर


आत्तापर्यंत मी इंदोरला तीन वेळा गेलेय, वेगवेगळ्या कॉन्फरेन्स आणि वर्कशॉप साठी पण अजून पण इंदोर म्हटले कि डोळ्यासमोर  येते ते फक्त खाणे आणि खाणेच. इथले चाट चे प्रकार, भुट्टे का किस, फलाहारी मिसळ, पाणीपुरी, दहीपुरी, आलू टिक्की आणि काय काय. मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत पण ज्यांना आवडते त्यांनी इथल्या मिठाया गुलाबजाम बर्फी सहज फस्त कराव्यात अश्या आहेत.

पहिल्यांदा इंदोरला जाताना मी ट्रेन ने गेले होते माझ्या शेजारच्या सीट वर दोन इंदोर चे व्यापारी होते. माझी सीट खालची होती आणि त्यामधील एकाला वरची सीट मिळाली होती पण आपल्या प्रचंड देहयष्टीमुळे त्यांना वर जाणे शक्य नव्हते म्हणून मग त्यांनी मला तू वर जाशील का ? अशी विनंती केली अर्थात मी हो म्हणाले. काही वेळाने त्यांनी त्यांचे डबे उघडले आणि अर्थात मला खाण्यासाठी आग्रह केला माझे नुकतेच जेवण झाल्यामुळे मी त्यांना नाही म्हणाले पण मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन चे पुडे फोडले आणि  मग त्यावर ताव मारत, "आमचे इंदोर किती भारी आहे, तिथे कसले भारी नमकीन मिळतात आणि कसे मस्त मस्त चाट चे प्रकार आहेत" हे सांगू लागले. माझे जेवण झाले आहे आणि मी आता काही खाऊ शकत नाही हे त्यांना पटतच नव्हते, त्याच्या बोलण्याप्रमाणे नमकीन चाट गोड मिठाया या तर जेवणानंतर खायच्या असतात आणि त्या मी खायलाच हव्या होत्या :) पण त्यांनी जे मला इंदोर च्या सराफा बाजार चे वर्णन केले त्यावरून मला ती खाऊगल्ली पाहण्याची इच्छा झाली. मग ज्या ज्या वेळेस मी इंदोरला गेले तेव्हा सराफा बाजार ला गेले नाही असे कधी झालेच नाही. जेव्हा आमची आय आय एम इंदोर ला कॉन्फरेन्स होती तेव्हा आम्ही एवढ्या लांबून रोज सिटी मध्ये हे सगळे प्रकार खाण्यासाठी यायचो आणि परत जायचो.

इंदोर चा सराफा बाजार हा साधारण १००- १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. आपल्या सुवर्णव्ययसायाच्या सुरक्षिततेसाठी सराफांनी छोट्या खाद्य व्यावसायिकांना आपल्या दुकानासमोर ठेले मांडण्याची परवानगी दिली. तसेच या व्यवसायांमुळे लोकांची या  परिसरात गजबज राहील हा पण हेतू होताच. पण कालांतराने तिथे खाद्य व्यवसाय चांगलाच रुळला. लोक सोने खरेदी साठी नाही तर वेगवेगळे खमंग पदार्थ खाण्यासाठी इथे गर्दी करू लागले. साधारण रोज २००० ते २५०० लोक या परिसराला भेट देतात आणि हि खाऊ गल्ली रात्रभर चालूच असते.

इथे गेलात के काय खाल याची लिस्ट देत आहे. अर्थात हे सगळे पदार्थ खाण्यासाठी पोटात जास्तीची जागा ठेऊन जायला पाहिजे

छोले आलू टिक्की चाट-
 गरमागरम छोले आणि आलू टिक्की ज्याच्यावर इंदोरी शेव आणि तिखी मिठी चटणी दिली जाते. टिक्की अर्थातच जास्तीच्या बटर मध्ये तळलेली  असते. कॅलरीज चा अजिबात विचार करता हे टिक्की चाट खा. शर्माजी चाटवाले यांच्याकडे हे चाट खाण्यासाठी नेहमी गर्दी असते यात खरोखरच मस्त फ्लेवर आहेत थोडीशी तिखट गोड आंबट अशा चवीची टिक्की पोटात जाताच मन खुश होऊन जाते. पनीर छोले टिक्की साधी टिक्की मसाला टिक्की असे अनेक पर्याय आहेत.


भुट्टे का किस -
हा भुट्टे का किस एक इंदोरी पदार्थ आहे. भुट्टे म्हणजे मक्याची कणसे किसून शिजवून उपम्यासारखे बनवतात यात बनवताना  दूध टाकतात आणि मग ओल्या खोबऱ्याने सजवून हि डिश दिली जाते. हि पण मस्त डिश आहे जरूर ट्राय करा.

दही बडे
आपल्या कडच्या दहीवड्या सारखी हि डिश आहे पण अर्थातच सगळे इंदोरी मसाला फ्लेवर आहेत. जीरा पावडर चाटमसाला आणि गोड दही घालून हे दहिबडे दिले जातात. जोशी दहीबडा हाऊस यांचे  दहीबडे जास्त फेमस आहेत


गराडू चाट
थंडी च्या दिवसात इथले लोक गराडू चाट खातात, गराडू म्हणजे सुरण त्याचे छोटे छोटे काप करून त्यावर गराडू जरालू मसाला टाकतात या मसाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचे मिश्रण असते आणि मग या चाट वर लिंबू पिळून खायला देतात.


गोलगप्पे
गोलगप्पे अर्थातच पाणीपुरी जी वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर मध्ये मिळते. इंदोर मधील माणसे आरामात ३-४ प्लेट पाणीपुरी खातात यात पण दहीपुरी शेवपुरी मस्त आहेत.



मालपूवा गुलाबजाम -
सराफाच्या सुरुवातीलाच गुलाबजाम करणारे लोक आहेत पूर्ण कढई भरून गुलाबजाम पाकात मुरत घातलेले असतात यात कालाजामुन फेमस आहे ज्यांना गोड आवडते त्यांनी मालपुवा खावा.


मुंग कि भजिया
मूग कि भजिया म्हणजे मुगाची डाळ भिजवून बनवले भजे आणि त्यावर हिरवी चटणी गरमागरम भज्यांचा आस्वाद घेणयासाठी इथे खूप गर्दी असते.


शिकंजी
शिकंजी हे एक पेय आहे जे दुध दही केसर बदाम जायपत्री घालून बनवतात यात थोडेसे फ्रेश क्रीम पण घातलेले असते. हे  पण एक मस्ट ट्राय पेय आहे. ज्यांना कुल्फी आवडते त्यांच्या साठी शाही कुल्फी, फायर कुल्फी असे वेगवेगळे प्रकार आहेत जरूर खाऊन पहा.


अजून असे कितीतरी पदार्थ आहेत कि जे मला आता आठवत नाही अर्थात हे सगळे पदार्थ मी एकाच ट्रिप मध्ये खाल्लेत असे पण  नाही पण अजून इतक्या वर्षानंतर मला या सगळ्याबद्दल लिहावेसे वाटले म्हणजे ते किती टेस्टी असतील हे तुम्हीच ओळखा.

मग कधी निघताय इंदोर ला ??


या ब्लॉग मधील फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत आणि इंटरनेट वरून घेतले आहेत 

Monday, August 5, 2019

कोणते कपडे घालू ???


मागच्या आठवड्यात आम्हाला लोणावळ्याला जायचे होते माझ्या मैत्रिणीने मला संध्याकाळी वाजता फोन केला वृषाली मी कोणता ड्रेस घालू तू काय घालणार आहेस ? मी हाय हिलचे सॅन्डल घालू कि नॉर्मल चप्पल ? मग माझ्या अनुभवाने मी तिला सल्ला दिला. खर तर " मी काय घालू " हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्यात आपण जरा बरे दिसावे हे बायका काय आणि पुरुष काय सगळ्यांनाच वाटते. आणि आजकाळ सोशल मीडिया चा जमाना आहे. आपले फोटो कसे चांगले येतील आणि त्याला किती लाईक आणि कंमेंट येतील याकडे पण सगळ्यानाचे लक्ष असते. मी कुणी स्टायलिस्ट नाही पण कुठे कोणते कपडे घालायचे याचे थोडेफार कळते. मी पलाझो वर स्पोर्ट्सशूज घातलेल्या मुली पहिल्या आहेत. तसेच शॉर्ट्स घालून भाजी आणायला आलेल्या मुली पण पहिल्या आहेत. आणि जिम ला येताना नाईटड्रेस घालून आलेल्या मुली पण पहिल्या आहेत. यांच्याकडे पाहून वाटले कि यांना कुठे कोणते कपडे घालावेत हे कळत नाही का? माझ्या निरीक्षणांमधून आणि वेगवेळ्या मासिकामध्ये वाचून कुठे कोणते कपडे घालावेत याबद्दल लिहीत आहे. तुम्हाला योग्य वाटल्यास कळवा.

कपडयांची निवड- 

ऑफिस वेअर -
जर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करत असाल तर वेस्टर्न लुक चे कपडे निवडा. पण हे कपडे निवडताना आपल्या शरीराचा आकार लक्षात घ्या. बारीक लोकांना सगळेच कपडे शोभून दिसतात पण स्थूल लोकांना कपडे निवडताना काळजी घ्यावी लागते. फार सैल कपडे घालू नका तसेच फार घट्ट पण कपडे घालू नका. काम करताना आपल्या कपड्याकडेच सतत पाहावे लागत असेल तर असे कपडे वापरने टाळा. चुरगळलेले कपडे घालून कामाला जाऊ नका. इस्त्री केलेले नीटनेटके कपडे घाला. वेगवेगळ्या ऑनलाईन स्टोर ऑफिसवेअर उपलभद्ध आहेत तिकडून तुम्ही ते खरेदी करू शकता. जर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर कॉटनच्या साड्या, पंजाबी ड्रेस, लॉन्ग कुर्तीची निवड करू शकता.


पिकनिक -
जर तुम्ही मित्र मैत्रिणीबरोबर फिरायला जाणार आहेत तर जीन्स हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला आवडत असतील तर वेगवेगळे शॉर्ट जॅकेट्स तुम्ही टॉप वर घालू शकता. पलाझो हा पण पर्याय आहे काहीजणींना शॉर्टटॉप घालायला आवडत नाहीत त्या लॉन्ग टॉप घालू शकता. यातही पिकनिक चे ठिकाण आणि ऋतू कुठला आहे यावर कपडे निवडावे पावसाळ्यात पलाझो घालून गेला तर रस्त्यावरील चिखलात भिजून निघेल.

लग्नकार्य समारंभ -
कुठलाही कार्यक्रम ठरला कि बायकांची आणि मुलींची एका विषयावर चर्चा सुरु होते, कोणते कपडे घालायचे ? हल्ली त्यात थिम बेस कार्यक्रम असतात. सगळ्या लोकांसाठी कपडे कोणते घालायचे ठरवले जाते. त्यात काही ऍक्टिव्ह लोकांकडे हे काम आपसूक येते. जर जवळच्या नात्यामधील लग्न असेल तर साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यात पण बनारसी सिल्क साड्या उठून दिसतात. दागिने निवडताना काळजीपूर्वक निवडावे. असतील नसतील तेवढे सगळे दागिने घालून कार्यक्रमाला जाऊ नये, ते फार चांगले दिसत नाही आणि एवढे दागिने घातल्याने मोठा सोनेरी सापच गळ्याभोवती टाकलाय असे दिसते. कारण ते सगळे दागिने एकमेकांमध्ये अडकून बसतात. एक मोजका नीट दागिना घातला तरी छान दिसतो. जर छोटा समारंभ असेल तर वनपीस घालावेत ते जास्त छान पण दिसतात आणि पटकन तयार व्हायला सोपे जाते. वनपीस वर शकत्यो सोन्याचे दागिने जात नाहीत तुम्ही सोन्याचे दागिने घालणार असाल तर छोटे दागिने घाला. आजकाल मार्केट मध्ये आर्टिफिशिअल ज्वेलरी मिळते ती वापरू शकता.


घरगुती पूजा हळदीकुंकू -
हळदीकुंकू घरगुती पूजेसाठी काठपदरची साडी किंवा आवडत असल्यास नऊवारी साडी घालू शकता. पारंपरिक दागिने आणि गजरा घातला कि ती गृहिणी परिपूर्ण दिसते. 


परदेश वारी  -
जेव्हा तुम्ही देशाबाहेर प्रवासाला निघता त्यावेळेला त्या देशामध्ये कसे वातावरण असेल हे आधीच इंटरनेट वर पाहून ठेवावे. बरेचदा यूरोपीय देशामध्ये थंडी असते, त्या वेळेस तुम्ही थर्मलवेअर आणि मोठे जाड जॅकेट्स आपल्याकडूनच  घेऊन जा. नाहीतर एअरपोर्ट ला उतरल्यावर आधी जॅकेट्स विकत घ्यायला जावे लागेल. आपले कपडे तिकडे फार चालत नाहीत घातले तरी त्यावर ओव्हरकोट घालावे लागतात. हँडग्लोव्हज टोपी पण जवळ ठेवा.जास्त कपडे नेऊ नका कारण काही घातले तरी त्यावर जॅकेट घालावेच लागते.  परदेशात साडी घालून फक्त हिंदी सिनेमातल्या हिरोईनच वावरू शकतात आपण नाही.


हे सगळे घालताना आपल्याला काय चांगले दिसते कुठल्या कपड्यामध्ये आपल्याला आरामदायक वाटते हे महत्वाचे आहे.

या लेखामधील चित्रे  प्रतिनिधीक स्वरूपाची आहेत आणि इंटरनेट वरून घेतलेली आहेत.