Sunday, June 20, 2021

आपले काम आणि आपले आरोग्य

मी परदेशातील लोकांबरोबर गेली 5 वर्षे सलग काम करते आहे आमच्या वेगवेगळ्या ऑनलाइन मीटिंग असतात, ई-मेलने कम्युनिकेशन असते तर कधी एकत्रित रित्या आम्ही गूगल डॉक्युमेंट वर काम करतो, या सगळ्यात मला एक गोष्ट लक्षात आली आहे की कोणतेही परदेशी लोक शनिवार आणि रविवारी तुमच्या कोणत्याही मेलला रिप्लाय करत नाहीत. कुठलिही ठरलेली मीटिंग अजेंडा वरच चालते इकडे तिकडे भरकटत नाही. मीटिंग जर 1 तासाची असेल तर ती 1 तासा मधेच संपते. वेळेच्या बाबतीत ते लोक आपल्यापेक्षा खुप पर्टीक्यूलर आहेत. जेव्हा आमच्या टीम पैकी कोणी सुट्टीवर जाते तेव्हा आम्हाला मेलला अलर्ट सेट करावे लागतात की, "या दिवसापासून या दिवसापर्यंत मी सुट्टी वर आहे आणि तुमचे काही महत्वाचे काम असेल तर या मेल वर किंवा फोन वर कॉनक्ट करणे." जेव्हा माझी फ्रेंच मैत्रीण सुट्टीवर गेली होती तेव्हा तिने आधीच मला मेसेज करून कळवले की," मी सुट्टीवर जात आहे आणि मी मोबाइल लॅपटॉप काहीच घेऊन जात नाही म्हणून कदाचित तुला रिप्लाय द्यायला जमणार नाही." पण आपल्याकडे आपण सुट्टीवर गेलो की आपला लॅपटॉप आणि फोन बंद करता येत नाही. कारण जरी आपण जरी सुट्टीवर असलो तरी आपल्याला फोन आणी ई-मेल येतच असतात आणि मग आपल्याला दिवसभर फिरून रात्री हॉटेलच्या रूम मध्ये बसून या सगळ्यांना उत्तरे द्यावी लागतात. तसेही आपल्याला आपल्या प्रत्येक ट्रिप चे फोटो सोशल मीडिया वर टाकायची सवय असतेच ( याला मी पण अपवाद नाही ) याचा अर्थ आपण जेव्हा सुट्टीवर जातो तेव्हा पण आपले काम पण आपल्या बरोबर घेऊन जातो. आपल्या स्वतःला चांगला वेळ देणे हे आपल्याला चुकीचे वाटते कदाचित आपल्यावर लहानपणा पासून तसेच संस्कार दिलेले असतात 'नाही म्हणणे' किंवा 'मी आता सुट्टीवर आहे मी तुम्हाला आल्यावर सांगेल' हे म्हणायला आपल्याला जमत नाही. किंवा आयुष्यातील थोडा वेळ आपल्या स्वतःला द्यावा हे कधीच आपल्याला शिकवले गेलेले नाही. मी हे सगळे का लिहितेय कारण आपल्या कडे हे खूपच अपवादाने पाहायला मिळते, सरकारी ऑफिस शाळा कॉलेजेस सोडली तर कोणतेही कंपनीचे ऑफिस वेळेत बंद होत नाही, फॅक्टरी मध्ये शिफ्ट असतील तरी " ओव्हरटाईम " नावाचे लालूच कंपन्यांनी ठेवलेले असते. आणि बहुसंख्य लोक ओव्हरटाईम करायला होकार देतात. मग घरी आल्यावर पण उशिरा पर्यंत चालणारे ऑफिस आणि कामाचे फोन कॉल पण यातच आले. मध्ये लिंकडीन वर पण एक पोस्ट आली होती एका आयटी मधील नवऱ्याने लिहिलेली, त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली होती आणि तो हॉस्पिटल मधून लॅपटॉप वर काम करत आताच्या कोविडं मध्ये मी कसा घराला आणि कामाला एकाच वेळी वेळ देऊ शकलो आहे अशा आशयाची पोस्ट लिहून त्याने कंपनी चे आभार पण मानले होते. खरच जिथे बाळाच्या आईला तिच्या नवऱ्याची गरज होती तिथे हा लॅपटॉप घेऊन काम करत होता म्हणजे किती वेळ त्याने आपल्या बाळाला आणि आणि बायकोला दिला असेल हा प्रश्नच आहे. खर तर जास्त वेळ काम करणे म्हणजेच चांगले काम होणे अशी खूप भारतीय लोकांची समजूत आहे. आपल्या वेळेची आणि तब्येतीची कामापुढे कोणाला पर्वा नाही आणि घरी वाट पाहणाऱ्या परिवाराची त्याहून नाही. आणि शहरात घरे एक टोकाला आणि ऑफिस दुसऱ्या त्यामुळे प्रवासात लागणारा वेळ पण जातोय या कडे कोणाचे लक्षच नाही. या सगळ्यात आय टी चे खूप कर्मचारी अग्रेसर आहेत, 8 ते 10 तास कॉम्पुटर समोर बसून राहताना त्यांना आपल्या पोटाचे घेर आता टेबल ला चिटकायला लागले आहेत हे लक्षात येत नाही. तसे पण जगातल्या कॉल सेंटर मध्ये काम करणारे 70 % लोक भारतीय आहेत जे दिवसा झोपतात आणि रात्रभर काम करतात मग रात्री झोप येऊ नये म्हणून कॉफी पिणे , सिगरेट ओढणे वेळी अवेळी ऑनलाइन स्नॅक्स ऑर्डर करणे हे आता आपल्या कडे तरुण पिढी मध्ये खूप कॉमन होत चालले आहे या सगळ्यामुळे भारतीय लोकांचे आयुष्यमान पण कमी होत चालले आहे. सतत चे कामाचे ताण घेऊन लोकांनी आपल्या आयुष्यातील चांगले मौल्यवान क्षण गमवायला सुरवात केली आहे. हे क्षण शनिवार रविवार च्या मॉल च्या वारीत पण भरून येत नाहीत हे सुद्धा कोणाला समजत नाहीये. हे सगळे कुठवर चालणार आहे माहीत नाही पण आता या सगळ्यांवर विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. खर तर प्रत्येकाने आपल्या कामावर प्रेम करायला पाहिजे पण आपल्या कामाचे योग्य नियोजन करून स्वता:साठी आणि आपल्या परिवारासाठी पण थोडा वेळ नक्की द्यायला हवा. कामावर प्रेम कराच पण त्यापेक्षा जास्त आपल्या आरोग्यावर करा. कारण आरोग्य नीट तरच काम नीट. खालचे चित्र इंटरनेट वरून घेतले आहे आणि ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे